मंगळवेढा तालुक्याच्या विकासाचा महान युगपुरुष, मारवाडी वकील साहेब... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, May 29, 2020

मंगळवेढा तालुक्याच्या विकासाचा महान युगपुरुष, मारवाडी वकील साहेब...       
           मंगळवेढा - मारवाडी वकील साहेब यांची आज बारावी पुण्यतिथी, यानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. मंगळवेढा तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले एक सर्वसामान्य नेतृत्व, म्हणून वकील साहेब सर्वांना परिचित आहेतच. फक्त मंगळवेढा तालुका नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा, कर्तुत्वाचा वेगळाच ठसा उमटवलेला आहे. वकील साहेबांच्या जन्म १४ नोव्हेंबर १९१६ रोजी झाला असून, त्यांचे शिक्षण बीए एलएलबी झाले होते. त्यांना सहा मुलं- रमेश, सुभाष, किशोर, प्रकाश, श्रीकांत, अनिल तर सहा मुली- केशर सारडा सातारा, अलका भट्टड कराड, मंगल कासट बागलकोट, सीताबाई हेडा येवला, सरला सोनी मालेगाव, शांता मालपाणी लातूर अशा चांगल्या कौटुंबिक सदन ठिकाणी प्रापंचिक आहेत.
             ब्रिटिश राजवटीत, सोलापूर येथे शिक्षण घेत असतानाच मारवाडी वकिलांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेऊन, चंदेले गुरुजी, तुळशीदास जाधव यांचे बरोबर क्रियाशील कार्यात भाग घेतला. पुण्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब भोपटकर यांनी सोलापूर महानगरपालिकेवर तिरंगा फडकवला.त्यामुळे ब्रिटिश संतापले. त्यांनी मार्शल लॉ जाहीर केला. सोलापुरात दंगली, जाळपोळ, निदर्शने चालू झाल्या. हे दृश्य प्रत्यक्ष डोळ्यांनी वकील साहेबांनी पाहिल्यामुळे, प्रेरित होऊन राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते झाले. त्यांनी कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार केली. ते समाजकारणात आणि राजकारणात रमले.
            पश्चिम महाराष्ट्रात सन १९५९ च्या दरम्यान सहकार चळवळ फोफावली होती. त्यात वकील साहेबांनी हिरारीने भाग घेऊन तालुक्याच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासा साठी सहकारी संस्थांची निर्मिती करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते हळूहळू सत्यात उतरवण्याचे काम त्यांनी केले.
 खरेदी विक्री संघ..
             मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि मंगळवेढा या संस्थेची दि. १५/१२/१९५९ रोजी पहिली सहकारी संस्था, शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या सोयीसाठी स्थापन झाली. स्वतः मारवाडी वकील संस्थापक चेअरमन झाले. आणि शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे विक्री, मशिनरी विक्री, स्वस्त धान्य दुकान,  कापड दुकान, आडत दुकान, पेट्रोल विभाग इत्यादींची सोय करून दिली. तालुक्याच्या विकासाची दिशा, या संस्थेतून चालू झाली.सध्या ही संस्था मा.बबनराव आवताडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सिध्येश्वर आवताडे चेअरमन म्हणून धुरा सांभाळत आहेत.
कृषी उद्योग संघ.....
               पहिल्यांदा तालुका डेव्हलपमेंट बोर्ड या नावाने ही संस्था स्थापन झाली. पुन्हा तिचे रूपांतर कृषी उद्योग संघात करून शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या गेल्या. या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. ही संस्था एसटी स्टँडच्या समोर असल्याने, तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांना, बसण्याचे, उठण्याचे ठिकाण म्हणून चांगले परिचित होते. यावेळी तालुक्यातील जनसंपर्क वाढला आणि १९६२ मध्ये विधानसभा सदस्य म्हणजे आमदार झाले. साधारण १९६२ ते १९७२ दहा वर्षे तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. 
 कृषी उत्पन्न बाजार समिती( मार्केट कमिटी)....
           मंगळवेढा तालुका कृषी पणन संस्था, दि.१९/५/१९६५ रोजी स्थापन केली. याकरिता लक्ष्मण रामचंद्र नागणे यांनी नाममात्र किमतीला स्वतःची जमीन दिली, म्हणून वकील साहेबांनी त्यांना मार्केट कमिटीचे पहिले चेअरमन केले व तालुक्यातील शेतकरी व ग्राहकांची सोय करून दिली.मा. बबनराव आवताडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सोमनाथ आवताडे चेअरमन म्हणून काम करत आहेत.
 भू-विकास बँक....
       
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते, त्यांच्या माध्यमातून सोलापूर येथे  भू- विकास बँकेची स्थापना, स्वतः मारवाडी वकिलांनी केली. त्यांनी स्वतः संस्थापक चेअरमन म्हणून काम पाहिले. सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्यावेळी नामदेवराव जगताप गट आणि शंकरराव मोहिते गट असे दोन गट पडले होते. नामदेवराव जगताप स्वतः झेडपी अध्यक्ष आणि डीसीसी बँकेचे चेअरमन होते. शंकरराव मोहिते कडे जिल्हा लेव्हलचे कोणतेच पद नव्हते. त्यामुळे मारवाडी वकिलांनी भूविकास बँक चेअरमन पदाचा राजीनामा देऊन, स्वतःची खुर्ची रिकामी करून, शंकरराव मोहिते यांना चेअरमन केले आणि त्या वेळी मारवाडी वकील मोहिते गटाचे कट्टर नेते म्हणून ओळख निर्माण झाली. सन १९७० साली या बँकेची पहिली शाखा, नाममात्र रुपये ४० फक्त भाड्याने स्वतःची जागा देऊन, मंगळवेढ्यात आणली. या बँकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा संस्था, शेतकऱ्यांसाठी शेतीसुधारणा कर्जे, ट्रॅक्टर इत्यादी सुविधा देऊन, तालुक्याचा विकास केला.
डीसीसी बँक संचालक....
               सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापनेपासून चार पंचवार्षिक बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प, मध्यम व दीर्घ मुदत कर्ज देऊन शेतकऱ्यांच्या विकास केला. तालुक्‍यातील २५ ते ३० कर्मचारी या बँकेत तर ६० ते ७० सेक्रेटरी विकास सोसायटीच्या माध्यमातून कामाला लावले. या माध्यमातून कॅडर ची स्थापना केली.
 राज्य मार्केटिंग फेडरेशन संचालक.....
                ही संस्था राज्य लेव्हलची
असून, शेतकऱ्यांशी निगडित आहे. अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. राज्य शासन या संस्थेमार्फत मका, हरभरा, तूर खरेदी करीत असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळतो.या संस्थेचे तीन टर्म संचालक होते. साधारण १९८९ ते १९९२ या कालावधीत या संस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले. 
 काकासाहेब बर्वे वस्तीग्रह.....
              ग्रामीण भागातून बरेच विद्यार्थी राहण्याची सोय नसल्याने, शिक्षणापासून वंचित राहतात, म्हणून तालुक्याच्या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काकासाहेब बर्वे वसतिगृहाची स्थापना करण्यात आली होती
 दामाजी पतसंस्थेची स्थापना.....
             मंगळवेढा तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांची आणि सर्वसाधारण माणसाची आर्थिक कोंडी होऊ नये, म्हणून बँक स्थापनेसाठी शेअर्स गोळा केले, परंतु त्यावेळी काहीतांत्रिक अडचणी मुळे परवानगी मिळत नसल्याने, श्री संत दामाजी सहकारी नागरी पतसंस्थेची स्थापना केली गेली. 
 साखर कारखान्याची निर्मिती.....
             कायम दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या तालुक्यामध्ये, एक ही मोठा औद्योगिक प्रकल्प नव्हता. तालुक्यातील काही भागांमध्ये ऊस पिकवला जात होता, परंतु पिकवलेला उस गळीतासाठी, इतर कारखान्याला घालण्यासाठी, या शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत होती. शेतकऱ्यांचीही होणारी अडवणूक पाहता, या तालुक्याला एखादा साखर कारखाना असावा, ही तळमळ मारवाडी वकील साहेबांना लागून राहिली होती. केंद्रीय मंत्री मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून, पाठपुरावा करून, संत दामाजी कारखान्याला त्यांनी मंजुरी आणली. आणि २८/२/१९९० मध्ये संत दामाजी साखर कारखान्याची ची स्थापना झाली. या कारखान्याचे शेअर्स मिळवण्यासाठी मारवाडी वकील साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदी पायपीट केली होती. मारवाडी वकील साहेबांनी लावलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षा मध्ये रुपांतर झाले आहे. तालुक्यातील एक हजार ते बाराशे कामगार प्रत्यक्ष काम करीत आहेत. या औद्योगिक प्रकल्पावर आज अनेक घटक अवलंबून आहेत. तब्बल तेरा वर्षे त्यांनी या कारखान्याचे चेअरमन पद भूषवले आहे.सध्या या कारखान्याचे चेअरमन म्हणून मा.युवा नेते समाधान आवताडे कार्यरत असून. संत दामाजी कारखाना हा जिल्ह्यातील एक नामवंत साखर कारखाना म्हणून नावारूपास आलेला आहे.
           अशा या तालुक्‍याच्या विकासाच्या महान युगपुरुषाची प्राणज्योत दिनांक २९ मे २००८ रोजी  मावळली.  या युगपुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन आदरांजली अर्पण करतो.                                       
                                        लेखन                                                               नारायण माने, पाटकळ                                                         ९८५००३६५०३

Pages