सोलापूर शहराचे चार दिवसात सर्व्हेक्षण करा :-पालकमंत्री दत्तात्रण भरणे यांच्या आढावा बैठकीत सूचना.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, April 23, 2020

सोलापूर शहराचे चार दिवसात सर्व्हेक्षण करा :-पालकमंत्री दत्तात्रण भरणे यांच्या आढावा बैठकीत सूचना....



सोलापूर/प्रतिनिधी 
         कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी सोलापूर शहराचे चार दिवसांत  सर्व्हेक्षण करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या.

         
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज कोरोना विषाणू संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, मोहोळचे आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.

          सुरवातीस जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. त्यावर संसर्ग रोखण्यासाठी शहरातील प्रत्येक घराचे सर्व्हेक्षण होण्याची आवश्यकता आहे. हे सर्व्हेक्षण चार दिवसात पूर्ण करा. यासाठी जिल्हापरिषदेकडील मनुष्यबळाचा वापर करावा. त्यांना सर्व्हेक्षणासाठी किट द्यावे, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.  

          सर्दी, ताप आणि खोकला यावरील गोळया डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय देऊ नये, असे आदेश औषध दुकानांना द्यावेत. अशा आजारावर गोळया घेण्यासाठी कोणी आल्यास त्याचे ट्रेसिंग करा. त्यांची  विशेष फिवर क्लिनिक मध्ये चाचणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

          जिल्हाबंदी काटेकोर करा. पुणे मुंबईसह कोणत्याही जिल्ह्यातील बाहेरच्या व्यक्तीस जिल्ह्यात प्रवेश देवू नका. गरज भासल्यास सोलापूर शहरानजीकच्या तालुक्यातही लॉकडाऊन करा. संचारबंदीचे काटेकोर अंमलबजावणी करा, अशा सूचना त्यांनी पोलीस आयुक्त आणि अधीक्षक यांना दिल्या.

          कोरोना बाधित रुग्णांचे संपर्कातील लोक शोधून काढून त्यांच्या चाचण्या करा. चाचण्याकरण्याची गती वाढवण्यासाठी प्रयत्न करा. लातूर येथील प्रयोगशाळा लवकर सुरू करण्याची विनंती केली जाईल. त्यामुळे सोलापुरातील चाचण्या लवकर करता येईल,  यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर खासगी प्रयोगशाळांना चाचण्यासाठी मान्यता मिळवण्याचे प्रयत्न केले जातील, असे त्यांनी  सांगितले.
          गैरव्यवहार करणा-या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करा. शिधापत्रिका  धारकांना धान्य वेळेत मिळेल अशी कार्यवाही करा. धान्य वितरण करतांना रेशन दुकानात गर्दी होणार नाही या अनुषंगाने काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
         
          बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, पोलीस उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, उत्तम पाटील, हेमंत निकम, गजानन गुरव, अधीक्षक अभियंता संतोष शेलार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रवींद्र माने, तहसिलदार डी. एस. कुंभार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या सूचना...

  • ·        सोलापूर शहरातील सर्व्हेक्षण येत्या चार दिवसांत पूर्ण करा.
  • ·        सर्व्हेक्षणासाठी जिल्हा परिषदेकडील मनुष्यबळ वापरा.
  • ·        जास्तीत जास्त ट्रेसिंग आणि  टेस्टींग करा.
  • ·        सर्दी-खोकला तापावरील गोळया डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देऊ नका, असे मेडिकल दुकानांना आदेशित करा.
  • ·        जिल्हाबंदी कोटेकोर करा. बाहेरच्या एकही व्यक्ती शहर आणि जिल्ह्यात येता कामा नये.
  • ·        गैरव्यवहार करणा-या रेशन दुकानदारांवर कारवाई करा.


Pages