नागरिकांनी रस्त्यावर न येता घरी बसून रहावे :- पोलिस अधिक्षक मनोज पाटील .. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, March 26, 2020

नागरिकांनी रस्त्यावर न येता घरी बसून रहावे :- पोलिस अधिक्षक मनोज पाटील ..



मंगळवेढा/प्रतिनिधी
            कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी जनतेने रस्त्यावर न येता घरात बसून सहकार्य करावे. जनतेने घरात बसल्याशिवाय  हा आजार थांबणार नाही, किराणा दुकानात  जनतेने गर्दी करू नये,किराणा दुकानदार आता थेट विनामुल्य घरपोच माल पोहोच करतील. पोलिस रस्त्यावर थांबून व्यवस्थित काम करीत आहेत.मात्र त्यातूनही पोलिस काही चुका करत असतील तर थेट माइयाशी  एस.एम.एस.व्दारे संपर्क  साधावा असे आवाहन सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
          पोलिस अधिक्षक पाटील पुढे म्हणाले,कोरोना संसर्गजन्य आजाराने सर्वत्र धुमाकुळ घातला असून त्याला अटकाव करण्यासाठी तमाम जनतेने सहकार्य करण्याची गरज आहे.एकटा पोलिस काहीही करू शकत नाही. त्यासाठी सर्वांच्या मदतीची नितांत गरज आहे.सध्या पोलिस,आरोग्य खाते आदी यंत्रणा दिवसरात्र जीव ओतून  काम करीत आहे. सध्या शासनाने जमावबंदी आदेश  जारी केला असून तो पाळणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.
         






कोरोना संसर्गजन्य लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास पत्रकारांनी थेट संपर्क साधून आम्हास कळवून सहकार्य करावे.नागरिकांनी वस्तूंचा व धान्यांचा साठा करू नये.कोणीही  अफवा पसरवू नये. सध्या आणीबाणीची परिस्थिती असून अशा परिस्थितीत अफवा पसरविणे गैर आहे.असे कोणी करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.ग्रामीण भागात पोलिस पाटील व सरपंच यांनी जागरूक राहून नव्याने आलेल्या व्यक्तीबाबत आजाराची चौकशी करून त्यांच्या नोंदी ग्रामपातळीवर ठेवाव्यात तर शहरामध्ये  नगरपरिषदेचे नगरसेवक यांनी जागरूक राहून नवीन पेशंटची माहिती रजिस्टरला नोंद घ्यावी असे पाटील म्हणाले.
               पत्रकार हा  समाजामधील एक दूवा असून त्यांनी आपले सोबत ओळखपत्र ठेवून पोलिसांना दाखविल्यास पोलिस आपणास सहकार्य करतील.  पोलिसांनी आपले आरोग्य संभाळले तरच नागरिकांची सेवा ते करू शकतील.कमी पोलिस संख्येवर जास्तीत जास्त काम कसे करून घेता येईल यावर आमचा अधिक भर असेल वेळ पडल्यास पोलिसांच्या मदतीला होमगार्ड दिले जातील असे पाटील म्हणाले.
            यावेळी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने मंगळवेढयात आम्ही पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेत असल्याची माहिती दिली.यावेळी पोलिस प्रशासन तुम्हाला निश्‍चित सहकार्य करेल असे पाटील म्हणाले.या पत्रकार परिषदेला डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील, पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे व मोठया संख्येने दैनिकांचे  पत्रकार उपस्थित होते.

Pages