‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे’… आज शिवतीर्थावर होणार शपथविधी.. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, November 28, 2019

‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे’… आज शिवतीर्थावर होणार शपथविधी..


"अखेर दिव्य प्रभात न्यूजचा अंदाज खरा ठरला  "
   सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ..

मुंबई/प्रतिनिधी

        महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. २० वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री असतील.
         काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुक नेते स्टॅलिन आदी नेत्यांना शिवसेनेने निमंत्रित केले आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता असून, अहमद पटेल व अन्य राष्ट्रीय नेते शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहतील. दीड वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये बिगरभाजप काँग्रेस-जनता दल संयुक्त सरकारच्या शपथविधीसाठी सोनिया यांच्यासह मायावती आणि अन्य राष्ट्रीय नेते उपस्थित होते. याच धर्तीवर शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या या समारंभाला राष्ट्रीय नेत्यांनी उपस्थित राहावे, असे शिवसेनेचे प्रयत्न आहेत.
          शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि छोटय़ा पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या विधिमंडळ गटनेतेपदी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. या वेळी १ डिसेंबरला शपथविधी समारंभ होईल, असे जाहीर करण्यात आले होते; पण त्यानंतर १ डिसेंबरऐवजी २८ नोव्हेंबर रोजी शपथविधीची तारीख निश्चित करण्यात आली. त्यानुसार आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे शपथ घेणार आहेत.

वाहतूक उपाययोजन...
          स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील सिद्धिविनायक चौक ते माहीमच्या हरी ओम चौक, राजा बढे चौक ते केळुस्कर मार्ग चौक, ले. दिलीप गुप्ते चौक ते पांडुरंग नाईक मार्गाची दक्षिण वाहिनी, गडकरी चौक ते केळुसकर मार्ग (दोन्ही वाहिन्या), एल जे मार्गावरील बाळ गोविंदास मार्ग ते पद्माबाई ठक्कर मार्ग चौकातल्या मार्गावर वाहतुकीस परवानगी नसेल. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील सिद्धिविनायक चौक ते एम. बी. राऊत मार्गासह १६ मार्गावर वाहने उभी करता येणार नाहीत. त्यात केळुसकर मार्ग, एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, ले. दिलीप गुप्ते मार्ग, एन. सी. केळकर मार्ग, कीर्ती महाविद्यालयाजवळील रस्ता, काशीनाथ धुरू मार्ग, प्रभादेवी येथील पी. बाळू मार्ग, वरळी कोळीवाडा येथील आदर्श नगर, रफी अहमद किडवई मार्ग, पाच उद्यान, सेनापती बापट मार्ग, रानडे रोड, हिंदुजा रुग्णालयाजवळील कोटनीस मार्ग आदी रस्त्यांचा समावेश आहे. शपथविधीला विविध भागांतून येणाऱ्या वाहनांसाठीही त्या त्या भागातील सार्वजनिक वाहनतळांची व्यवस्था पोलिसांनी सुचवली आहे. पश्चिम उपनगरातून येणाऱ्या बसेससाठी सेनापती बापट मार्गावरील कामगार मैदान, लोढा पार्क येथे, तर हलक्या वाहनांसाठी इंडिया बुल्स सेंटर, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर आणि वर्ल्ड टॉवर्स येथील सार्वजनिक वाहनतळे आरक्षित ठेवली जातील.

कडेकोट बंदोबस्त.
          दरम्यान, शपथविधीसोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. तब्बल २ हजार पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधीला राजकीय पक्षांचे पुढारी, पदाधिकारी, शासनाचे अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहाणार आहेत. कोणत्याही अनुचित घटनेने या सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी सुरक्षेसाठीची सर्व खबरदारी घेण्यात येईल. स्थानिक पोलिसांसह सशस्त्र पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक बंदोबस्तासाठी तैनात असेल. परिसरातील प्रत्येक घटनेवर नजर ठेवण्यासाठी सीसीटाव्हींसह अन्य तांत्रिक उपाययोजना करण्यात येतील.

Pages