जेलमधून आरोपी पळूनही कर्तव्यात कसूर करणार्‍या त्या चार पोलिस कर्मचार्‍यावर कधी होणार कारवाई ? - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, November 28, 2019

जेलमधून आरोपी पळूनही कर्तव्यात कसूर करणार्‍या त्या चार पोलिस कर्मचार्‍यावर कधी होणार कारवाई ?
मंगळवेढा/प्रतिनिधी

           मंगळवेढा सबजेलमधून मागील दीड महिन्यापूर्वी चोरीच्या घटनेतील आरोपीला शौचास बाहेर काढल्यानंतर झाडाच्या फांदीचा आधार घेवून भिंतीवर चढून उडी मारून  पलायन केले होते. दरम्यान या घटनेला जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटूनही कर्तव्यात कसूर करणार्‍या त्या चार पोलिस कर्मचार्‍यावर अदयापही कुठलीच कारवाई न झाल्याने नागरिकांमधून पोलिस प्रशासनाच्या कारभाराबाबत संशय व्यक्त होत आहे.
                पंढरपूर तालुक्यातील एका आरोपीने मोटर सायकल चोरल्याप्रकरणी त्याला अटक करून मंगळवेढा सछबजेल कारागृहामध्ये ठेवले होते. कारागृहासाठी आरोपीच्या बंदोबस्तकामी रात्रपाळीत चार पोलिस कर्मचारी नेमण्यात आले होते. विधानसभा निवडणूकीपूर्वी चोरी प्रकरणातील आरोपीला शौचास बाहेर काढल्यानंतर भर दिवसा झाडाच्या फांदीचा आधार घेत भिंतीवर चढून सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या बाजूकडे उडी मारून पलायन केले होते.शौचास काढलेल्या आरोपींची पाहणी केल्यानंतर त्या चार पोलिस कर्मचार्‍यांच्या लक्षात आले की एका आरोपीने चौघांची  नजर चुकवून पलायन केले आहे.
           आरोपी पळाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व पोलिस कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले. त्यांनी लागलीच वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली व शोधाशोध सुरु झाली.आरोपीचा शोध घेत असताना एकाने तो ऊसाच्या फडात जात असल्याचे पाहिले होते. ही माहिती मिळताच डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांनी जादा पोलिसांची कुमक मागवून ऊसाच्या फडाला घेरावा घातला.एका पोलिस कर्मचार्‍याने झाडावर चढून ऊसाच्या फडाची टेहाळणी केली असता ऊसाच्या पुंजक्यात तो आरोपी लपून बसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या आरोपीस ताब्यात घेतले व पोलिसांनी सुटकेचा श्‍वास सोडला.
           ही घटना घडून जवळपास दीड महिन्याचा कालावधी होवूनही पोलिस प्रशासनाने कर्तव्यात कसूर करणार्‍या त्या चार पोलिस कर्मचार्‍यांवर अदयापही कुठलीच कारवाई केली नाही. या घटनेपुर्वीही खून प्रकरणातील एक आरोपी भिंतीवरून उडी मारून पलायन केले होते. त्याच्या शोधासाठी सोलापूरहून श्‍वास पथक मागविले होते. तोही खोमनाळ रोडवरील एका ऊसाच्या फडात  लपून बसला होता. त्यालाही ताब्यात घेण्यात आले.या घटनेचा अहवाल पोलिस अधिक्षक कार्यालयाला पाठविल्यानंतर सबजेलमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस नाईक कर्मचार्‍याची मुख्यालय येथे उचलबांगडीची कारवाई करण्यात आली होती. चोरीच्या घटनेतील आरोपी जेलमधून पळून जावूनही त्या चौघांवर कारवाई करण्याबाबत पोलिस प्रशासन हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप जनतेमधून होत आहे.
                 खून प्रकरणातील आरोपी पळून गेल्यानंतर त्या पोलिस नाईक कर्मचार्‍यावर कारवाई केली जाते, मात्र चोरी प्रकरणातील आरोपी जेलमधून पळून गेल्यानंतर त्या चौघावर कारवाई का होत नाही? असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे.कारवाईबाबत  पोलिस अधिकार्‍यांना विचारल्यानंतर आरोपी सापडला असल्याचे उत्तर दिले जात आहे. पण पहिल्या घटनेतील पोलिस नाईक कर्मचार्‍यावर कारवाई करून हया चौघांना अभय देणे म्हणजे त्या पोलिस नाईक कर्मचार्‍यावर अन्याय होत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणी लक्ष घालून कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचारी व अधिकारी यांचेवर कारवाई करावी अशी मागणी जनतेमधून आग्रहाने होत आहे.


सबजेलजवळ असलेल्या ह्याच झाडाचा फांदीचा आधार घेवून त्या आरोपीनी पलायन केले होते

Pages