तलवार हल्ला प्रकरणी आरोपीस पाच दिवसाची कोठडी - Divyaprabhat News

Breaking News

Friday, November 22, 2019

तलवार हल्ला प्रकरणी आरोपीस पाच दिवसाची कोठडी


व्यवसायाच्या स्पर्धेतून झाला होता तलवार हल्ला


मंगळवेढा/प्रतिनिधी


 वडा पाव विक्री व्यवसाय स्पर्धेतून हातगाडीचालक धनंजय माईनकर याच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अजय आसबे याला पोलिसांनी अटक करून गुरुवारी न्यायाधीश  आर.व्ही.नडगदल्ली यांच्यासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
         यातील फिर्यादी जखमी धनंजय माईनकर याचा जुन्या भाजी मंडईत पांडुरंग वडा पाव नावाचा हातगाडा आहे. याच्या शेजारी गुरु सुभाष निमंगरे यांचा महाकाली नावाचा वडा पाव विक्रीचा व्यवसाय असून या हातगाडीवर आरोपी अजय आसबे काम करतो. फिर्यादीच्या वडा पाव गाडयावर ग्राहकांची गर्दी असते. महाकाली वडा पाव सेंटरवर तुरळक ग्राहक येत असल्याने तो फिर्यादीच्या ग्राहकावर चिडून बोलत असे. तसेच ग्राहकांना मोटर सायकल थांबू देत नसे.या रागातून दि.20 रोजी सकाळी 11.30 च्या दरम्यान आरोपी अजय आसबे याने फिर्यादी धनंजय माईनकर यांच्यावर तलवारीने डोक्यात डावे कानाजवळ वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपी स्वतः येवून पोलिसात हजर झाला होता. तपासिक अंमलदार पोलिस उपनिरिक्षक  सचिन खटके  यांनी आरोपी अजय आसबे याला आज गुरुवारी अटक करून मंगळवेढा न्यायालयात उभे केले. यावेळी सरकार पक्षाच्यावतीने  तलवार कोठून आणली,या घटनेत अन्य कोणाचा सहभाग आहे काय याचा शोध घेणे आदी मुद्दे न्यायालयासमोर मांडल्यानंतर न्यायालयाने दि.25 नोव्हेंबर पर्यंत पोलिस केाठडी सुनावली.
          दरम्यान पोलिसांनी या घटनेतील तलवार जप्त केली आहे. या घटनेतील जखमी व आरोपी हे वयाने 18 ते 19 वर्षाच्या दरम्यानचे असून एवढया कमी वयात  तलवार हल्ला झाल्याने मंगळवेढा शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.वाढदिवसालाही तलवारीने केक कापण्याचा प्रकार  दिवसेंदिवस बळावत आहे.मंगळवेढयात दोन पोलिस अधिकारी असताना तलवारीसारखे धारदार शस्त्र मंगळवेढयात येतात कसे असा सवाल शहरवासियांमधून विचारला जातो आहे.बेकायदा  शस्त्र जवळ बाळगणे हा कायदयाने गुन्हा असतानहाी राजरोसपणे केक कापण्यासाठी तलवारीचा अठ्ठाहास कशासाठी असा सवाल सुज्ञ नागरिकांमधून चर्चिला जात आहे.कर्नाटक राज्यातून ही शस्त्रे येत असावीत असा तर्क काढला जात आहे. यापुढे पोलिसांनी बेकायदा शस्त्रांना अटकाव करून मंगळवेढा शहरात घटना घडू नयेत याची खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे.

Pages