हे गोवा नाही महाराष्ट्र आहे, इथं काहीही खपवून घेतलं जाणार नाही :- शरद पवार - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, November 26, 2019

हे गोवा नाही महाराष्ट्र आहे, इथं काहीही खपवून घेतलं जाणार नाही :- शरद पवारमुंबई/प्रतिनिधी

"संसदेतील संसदीय विभागाकडून या संबंधीची स्पष्टता आम्ही घेतली असून घटनातज्ज्ञांची तसेच विधीमंडळातील निवृत्त अधिकाऱ्यांचेही याबाबत मत घेतले आहे."
       राज्यात भाजपाने अवैध पद्धतीने सत्तास्थापन केली. बहुमत नसताना हे सरकार सत्तेत आलं आहे. कर्नाटक, गोवा, मणिपूर येथे बहुमत नसताना भाजपाने सरकार स्थापन केलं होतं. याची आठवण करुन देत ‘हे गोवा नाही तर महाराष्ट्र आहे’ इथं काहीही खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला इशारा दिला आहे. मुंबईतील हॉटेल ग्रँट हयात येथे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या मिळून १६२ आमदारांचे महाविकास आघाडीकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले, यावेळी पवार बोलत होते.
           शरद पवार म्हणाले, सरकार स्थापनेसाठी संसदीय पद्धतीची जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्याला कसा हरताळ फसला जातो हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपाने दाखवून दिले आहे. इतर राज्यांमध्ये त्यांनी हेच केले आता महाराष्ट्राची वेळ आली आहे. आमच्या तिन्ही पक्षांच्या आमदारांची संख्या सत्तास्थापनेसाठी पुरेशी आहे त्यामुळे उद्याही आम्ही बहुमत चाचणीला सामोरे जायला तयार आहोत. मात्र, उद्या सुप्रीम कोर्ट बहुमत सिद्ध करण्याबाबत निर्णय झाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात येईल.
          आमच्या काही नव्या सदस्यांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात असल्याचे माझ्या कानावर आले आहे. तुमच्या विधीमंडळ नेत्यांकडून व्हीपची अंमलबजावणी केली जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली नाही तर सदस्यत्व रद्द करण्यात येईल असे त्यांना सांगितले जात आहे. मात्र, ज्या व्यक्तीला पक्षाने दूर करण्याचा निर्णय घेतला त्यांना त्या पक्षाच्या संदर्भात कुठलाही निर्णय काढण्याचा अधिकार नाही. संसदेतील संसदीय विभागाकडून या संबंधीची स्पष्टता आम्ही घेतली असून घटनातज्ज्ञांची तसेच विधीमंडळातील निवृत्त अधिकाऱ्यांचेही याबाबत मत घेतल्याचे यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवारांना आता कुठलाही अधिकार नाही त्यामुळे कोणी सांगत असेल की त्यांचं सदस्यपद धोक्यात येईल, तर याची मी जबाबदारीने सांगतो की त्याची जबाबदारी मी व्यक्तीगतरित्या घ्यायला तयार आहे. त्यामुळे नव्या सदस्यांचे सदस्यत्व धोक्यात येईल असे सांगण्याचा कोणीही प्रयत्न करुन नये.
         त्याचबरोबर अवैध पद्धतीने सत्तेत आलेल्यांना आपण दूर करु. किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांचे सरकार लोकशाही मार्गाने या महाराष्ट्रात आपण निर्माण होईल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरची कार्यवाही संपल्यानंतर राज्यपालांना तुम्हालाच सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण द्यावे लागेल, असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना यावेळी दिला.
         हे गोवा नाही महाराष्ट्र आहे त्यामुळे इथे काहीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही पवार यांनी यावेळी भाजपाला दिला. इथं जे अयोग्य आहे त्यांना धडा शिकवण्याचे काम आम्ही करु शकतो इतके आपण समंजस आहोत. भाजपाकडून जे काही केले जात आहे ते आम्ही होऊ देणार नाही हे महाराष्ट्र दाखवून देईल, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

Pages