स्वच्छता सुविधा सुरक्षा त्रिसूत्रीवर कार्तिकी वारीचे नियोजन :- डॉ.भोसले - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, November 2, 2019

स्वच्छता सुविधा सुरक्षा त्रिसूत्रीवर कार्तिकी वारीचे नियोजन :- डॉ.भोसले




पंढरपूर/प्रतिनिधी
          स्वच्छता, सुविधा आणि सुरक्षा या त्रिसूत्रीवर कार्तिकी वारीचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी यांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज दिल्या कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर आज शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
        बैठकीला पोलीस उप अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे,  तहसीलदार वैशाली वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण,  नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रभाकर नाळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगर भूमापन अधिकारी प्रिया पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे आदी उपस्थित होते.बैठकीत प्रथम सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग यांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला नदी पात्राशेजारील वाळवंटात पाणी असल्याने 65 एकर परिसरात वारकरी यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 65 एकर परिसरात स्वच्छता आणि नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.
          नदी पात्रात पाणी जास्त असल्याने प्रत्येक नौकेत लाईफ जॅकेट असायला हवेत. त्यासाठी जलसंपदा विभाग, नगर परिषद, विठ्ठल मंदिर समिती यांनी लाईफ जॅकेट उपलब्ध करुन घ्यावीत, अशा सूचना दिल्या.कार्तिक वारीच्या कालावधीत उजनी धरणातून पाण्याचा प्रवाह कमी करता येईल का याबाबत पोलीस विभाग आणि जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने नियोजन करावे, असे सांगितले वारकरी यांच्यासाठी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी खासगी डॉक्टर यांची मदत घ्यावी. महावितरण कंपनी कडून नदी पात्रात पुरेशी प्रकाशयोजना केली जावी, अशा सूचना डॉ. भोसले यांनी केल्या.
          मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या स्वच्छतेच्या बाबतच्या तयारीची माहिती दिली. मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्व्हेक्षण करा. त्यांना नोटीस द्या. या इमारती काढून टाकण्यासाठी पोलीस आणि नगरपरिषदेने कालबद्ध कार्यक्रम आखा. वारकरी यांची गर्दी असणाऱ्या आणि घाटावर जाणारे मार्गावरील अतिक्रमण हटवून टाका, अशा सूचना डॉ. भोसले यांनी दिल्या. पोलीस उपअधीक्षक सागर कवडे यांनी पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली.

Pages