उदयनराजे यांच्या भेटीनंतर अमोल कोल्हे बोलले “मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही” - Divyaprabhat News

Breaking News

Monday, September 2, 2019

उदयनराजे यांच्या भेटीनंतर अमोल कोल्हे बोलले “मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही”



सातारा/प्रतिनिधी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे उदयनराजे यांना भेटण्यासाठी आल्यानंतर ते त्यांच्या मनधरणीसाठी आले आहेत अशी चर्चा सुरु झाली. ही चर्चा खरीच होती. कारण अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंसोबत बंद दरवाजाआड केलेल्या चर्चेनंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे अमोल कोल्हे हे उदयनराजेंची मनधरणी करण्यात अयशस्वी ठरले आहेत असंही स्पष्ट होतं आहे. तसंच उदयनराजे भोसले हे भाजपात जाणार हेदेखील यावरुन स्पष्ट होतं आहे.
   उदयनराजे भोसले हे भाजपाच्या वाटेवर आहेत ही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांनीही याचे स्पष्ट संकेत दिले होते. “उदयनराजे भोसले भाजपात येतील, त्यांची इच्छा असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपा प्रवेश होईल ते राजे आहेत त्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण केली जाईल” असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर भाजपात जायचं की नाही हे माझं मी ठरवेन अशीही प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली होती. त्यांच्या भाजपा प्रवेशाबाबत विविध चर्चा सुरु असतानाच रविवारी सत्ता भाजपाकडे आहे म्हणून तिथे जाण्यात अर्थ नाही असे वक्तव्य केले. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या भाजपा प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आणि त्यांच्या मनधरणीचे प्रयत्नही केले. मात्र “मावळा छत्रपतींच मन वळवू शकत नाही” अशी प्रतिक्रिया त्यांनी या चर्चेनंतर दिली आहे. ही प्रतिक्रियाच बरंच काही सांगून जाणारी आहे.
   या दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. मीडियाशी फार काही न बोलता अमोल कोल्हे निघाले होते. मात्र उदयनराजे यांना शुभेच्छाही दिल्या आणि मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही असं म्हटलं आहे. तसंच राजे सोबतच रहावेत असं वाटतं आहे मात्र जो काही निर्णय ते घेतील तो मान्य आहे असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

Pages