त्या लाच प्रकरणातील तलाठ्यास 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, April 7, 2023

त्या लाच प्रकरणातील तलाठ्यास 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी....

मंगळवेढा/प्रतिनिधी
सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्गात बाधीत झालेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम देण्यासाठी सात हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी आरोपी तथा तलाठी सुरज रंगनाथ नळे याला पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार यांच्या गट क्र.52 कमलापूर हद्दीतून सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेल्याने पाईपलाईनच्या नुकसानीपोटी 1 लाख 43 हजार 794 इतकी रक्कम मंजूर झाली होती ती रक्कम सदर शेतकर्‍याला देण्यासाठी झीरो कर्मचारी पंकज महादेव चव्हाण (रा.शेलेवाडी) याच्या मार्फत सात हजार रुपये लाचेची मागणी करुन ती स्वीकारताना दि.29 च्या रात्री 10.15 वाजता लाचलुचपतच्या विभागाने सापळा लावला असता त्यांना पाहताच रक्कम घेवून तलाठी नळे चार चाकी वाहनासह फरार झाला होता. तपासीक अंमलदार पो.नि. उमेश महाडीक यांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन अखेर कामती पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन ताब्यात घेतले होते. दरम्यान आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाला होता. आरोपी नळे याने अखेर नांगी टाकत पोलीसासमोर हजर झाल्यावर पोलीसांनी त्याला अटक केली होती. प्रथमत: नळे याला चार दिवसाची व झीरो कर्मचारी चव्हाण याला चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. चव्हाण याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. तलाठी नळे याला एक दिवसाची वाढीव पोलीस कोठडी दिली होती. याची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गेल्या सहा महिन्यात महसूल मध्ये दोन लाचेची प्रकरणे घडल्याने महसूल खाते बदनाम झाले आहे. लाच प्रकरणातील दोन्हीही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
या घडलेल्या लाच प्रकरणामुळे मसहूल खाते चांगलेच चर्चेत आले आहे. मागील काही महिन्यापुर्वी तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाकडील पुरवठा निरीक्षक लाच प्रकरणात सापडले होते. त्यानंतर प्रांत कार्यालयातील तलाठी लाच प्रकरणात सापडल्याने मंगळवेढ्यात महसूल खाते लाच स्वीकारण्यात अव्वल ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग मंगळवेढ्यातून गेल्यापासून टक्केवारीची चर्चा होत असून बाधीत रक्कम सहजा सहजी शेतकर्‍यांना मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. शेतकर्‍यांच्या रक्कमा देण्यासाठी टक्केवारी घेतल्याचा बाधीत शेतकर्‍यांचा आरोप असून तो पैसा शेतकर्‍यांना परत मिळावा अशी बाधीत शेतकर्‍यांची मागणी जोर धरीत असून पैसा परत न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही बाधीत शेतकर्‍यांनी दिला आहे.

Pages