अवैध धंद्यावर छाप टाकण्यास पोलिस आल्याचे पाहून तो पळाला अन आपल्या जीवाला मुकला..... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, May 21, 2021

अवैध धंद्यावर छाप टाकण्यास पोलिस आल्याचे पाहून तो पळाला अन आपल्या जीवाला मुकला.....


दिव्य न्यूज नेटवर्क 

           नंदूर येथे पोलिस आल्याचे पाहून घाबरून पळत जाताना चक्कर येवून खाली पडल्याने नागेश नाथा हेगडे (वय 22) हा तरूण मयत झाला असून या घटनेची पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान,नातेवाईकांनी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तब्बल पाच तास मृतदेह पोलिस स्टेशनच्या दारात ठेवून ठाण मांडल्याने परिस्थिती गंभीर बनत असल्याने अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी तात्काळ मंगळवेढयास भेट देवून कुटुंबियांची समजूत काढल्याने अखेर या घटनेवर पडदा पडला.

                पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी दि.21 रोजी सकाळी 10.30 च्या दरम्यान यातील खबर देणारे नाथा हेगडे यांच्या घरासमोर पोलिसांची व्हॅन आली असता त्यातून पोलिस खाली उतरत असताना पोलिसांना पाहून मयत नागेश हेगडे हा पळून जात असताना घरापासून थोडया अंतरावर जावून तो बेशुध्द अवस्थेत कोलमडून पडला. दरम्यान,त्याला उपचारासाठी स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यांनी मंगळवेढा येथे घेवून जाण्याचा सल्ला दिल्याने कुटुंबियांनी त्यास महिला हॉस्पीटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केल्याचे दिलेल्या खबरमध्ये मयताच्या वडिलांनी म्हटले आहे.या घटनेनंतर मयताचे कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी मृतदेह सकाळी 11.00 वा. पोलिस स्टेशनच्या दारात आणून ठेवला. 

               सदर घटनेनंतर पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करत तब्बल पाच तास मृतदेह पोलिस स्टेशनच्या दारात होता.वातावरण गंभीर बनू पहात असल्याने  अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी तात्काळ मंगळवेढयातील घटनास्थळी भेट देवून कुटुंबियांची समजूत काढून या चालू घटनेची व नंदूर येथील मागीलवर्षी झालेल्या घटनेची पंढरपूर येथील डी.वाय.एस.पी. यांच्यामार्फत चौकशी करून दोन दिवसात अहवाल सादर केला जाईल असे आश्‍वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.प्रथमतः मृतदेहाची कोरोना चाचणी  केल्यानंतर तो रिपोर्ट निगेटिव्ह  आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सत्यजीत आवटे करीत आहेत.

        गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतदेहासह पोलिस स्टेशनच्या प्रांगणात  कुटुंबिय व ग्रामस्थांनी केलेली गर्दी छायाचित्रात दिसत आहे.

Pages