“मी शपथ घेतो की….”, उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ...... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, May 18, 2020

“मी शपथ घेतो की….”, उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ......


विधीमंडळात हा शपथविधी पार पडला.....

मुंबई/प्रतिनिधी

         मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. विधीमंडळात हा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बिनविरोध निवडून आलेल्या इतर आठ उमेदवारांनाही आमदारकीची शपथ घेतली. राज्यावर करोनाचं संकट असल्याने नेहमीप्रमाणे भव्य कार्यक्रम न घेता विधीमंडळात साधेपणाने हा शपथविधी पार पडला. शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राज्य सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला होता. पण उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने महाविकास आघाडीने सुटकेचा निश्वास सोडला होता.
           
विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली माघार घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नऊ अधिकृत उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली होती.

शपथ घेणारे सदस्य......
         * शिवसेना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नीलम गोऱ्हे
* भाजप – गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड
* राष्ट्रवादी – शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी
* काँग्रेस – राजेश राठोड
          शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. म्हणजेच मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या उभय सभागृहाचे सदस्य नाहीत. तसेच त्यांची २७ मेपूर्वी निवड होणे आवश्यक असल्याने नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी विनंती राज्यपालांनी निवडणूक आयोगाला केली होती.
          करोनाच्या संकटकाळात विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेना-राष्ट्रवादीची इच्छा असतानाही काँग्रेसने दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत राजी-नाराजीचे नाटय़ रंगलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आघाडीच्या नेत्यांची बैठक होऊन काँग्रेसने एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

Pages