कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करुनच शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी :- उपमुख्यमंत्री अजित पवार.. - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, April 18, 2020

कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करुनच शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी :- उपमुख्यमंत्री अजित पवार..

टाळेबंदी राहणारच, परंतु टप्प्याटप्प्याने अर्थव्यवस्थेला गती देणार....

मुंबई/प्रतिनिधी
            कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. सोमवार दिनांक  २० एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी  होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  आज दिली.
     
 देशात जाहीर टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी  त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केल आहे.मार्गदर्शक नियमावलीनुसार ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसाय, व्यापारी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी  स्पष्ट केले.  राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवण्यात आली असली  तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यापुढेही  नियमित सुरु राहील, त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. नागरिकांना, कोरोना प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.

Pages