राष्ट्रीय महामार्गाचा मोबदला न देताच जबरदस्तीने पोलिस बंदोबस्तात काम सुरु.. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, February 13, 2020

राष्ट्रीय महामार्गाचा मोबदला न देताच जबरदस्तीने पोलिस बंदोबस्तात काम सुरु..


 शेतकर्‍याने  अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा  प्रयत्न..

मंगळवेढा/प्रतिनिधी

             आंधळगांव ते मंगळवेढा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे.या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जमिनी शासनाने संपादित केल्या आहेत. मात्र संबंधित शेतकर्‍यांना आर्थिक मोबदला अदयापही मिळाला नाही. संबंधित ठेकेदाराने पोलिस फोर्स घेवून दांडगाईने सदर शेतकर्‍याच्या शेतातून रस्ता सुरु करण्याचा प्रयत्न करीत असताना तानाजी प्रभू वाकडे या शेतकर्‍याने बुधवारी सकाळी 11.30 वा. ट्रॅक्टरमधील डिझेल काढून अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असताना उपस्थित पोलिसांनी त्याला प्रतिबंध केल्याने पुढील अनर्थ टळला.
          मंगळवेढा येथील एका काझी नामक व्यक्तीने गणेशवाडी ते माचणूर इथपर्यंत रस्त्यालगत असणारी जमिन माझी असल्याचा अजब दावा केला आहे.त्यामुळे शेतकर्‍यांना प्रांताधिकारी पैसे वाटप करण्यात आकडता हात घेत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.जमिनीचा मोबदला न देताच पोलिस बंदोबस्तात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु केले आहे.शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळणे अपेक्षित आहे. मात्र प्रांताधिकारी उदयसिंह भोसले हे काझीच्या अजब दाव्यामुळे  शेतकर्‍यांना पैसे देण्यास तयार नाहीत. तर दुसरीकडे ठेकेदार काम थांबविण्याऐवजी पोलिस फोर्स घेवून कामे सुरु करीत असल्याने शेतकरी वर्गातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रत्येक ठिकाणी शेतकरी व ठेकेदार यांच्यामध्ये वाद घडत आहे. 
       
   आंधळगांव येथे शेतकरी व  इंजिनिअर यांच्यामध्ये हाणामारीचीही घटना घडली एकमेकाविरूध्द क्रॉस गुन्हे दाखल झाले. दि. 10 रोजी सकाळी 11.00 वा. गणेशवाडी ते आंधळगांव या रस्त्याचे काम सुरु होते. फिर्यादी ललीत जोशी हे रोडचे काम करीत असताना आरोपी  तथा शेतकरी युवराज तानगावडे (रा.गणेशवाडी) याने वाहनचालकास शिवीगाळ,दमदाटी करून हाताने मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली तर दुसर्‍या घटनेत सुनिल वेळापूरे (रा.आंधळगांव) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये आरोपी तथा इंजिनिअर ललितकुमार जोशी  हे रोडचे काम करीत असताना  फिर्यादी यांनी मोजणी होईपर्यंत काम करू नका असे सांगत असताना आरोपीने व त्याचे अज्ञात साथीदाराने शेतकरी फिर्यादीस शिवीगाळ,दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
शेतकर्‍यांना पैसे  न देताच ठेकेदार रेटून कामे करीत असल्याने असा हाणामारीचा प्रसंग वाढत जावून अशांतता निर्माण होत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या कामी वेळीच लक्ष घालून शेतकर्‍यांना मोबदला तात्काळ देवून रस्त्याचे काम मार्गी लागावे अशी मागणी होत आहे.

Pages