उपचारासाठी निघालेल्या शेतकर्‍याच्या खिशावर चोरटयांचा डल्ला... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, February 4, 2020

उपचारासाठी निघालेल्या शेतकर्‍याच्या खिशावर चोरटयांचा डल्ला...


मंगळवेढा/प्रतिनिधी
              मंगळवेढा बसस्थानकावर पंढरपूर एस.टी.मध्ये चढत असताना दवाखान्यास उपचारासाठी निघालेल्या  खोमनाळ येथील शेतकरी बाळकृष्ण भिमराव इंगळे याच्या खिशातील 21 हजार रुपयांचे पॉकेट चोरटयाने पळविण्याचा प्रकार भरदुपारी घडला असून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान,प्रत्येक आठवडी बाजार दिवशी चोरीच्या घटना घडत असताना पोलिस या घटनेकडे गांभिर्यपूर्वक पहात नसल्याने दिवसेंदिवस चोर्‍या वाढत चालल्याचे चित्र आहे.
               यातील फिर्यादी बाळकृष्ण भिमराव इंगळे हे दि. 3 रोजी दुपारी 12.45 च्या दरम्यान वडील भिमराव इंगळे हे हार्नियाच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांना ऑपरेशनसाठी पंढरपूरला दुपारी 12.45 वा. घेवून जात होते.बसस्थानकावरील लिंबाच्या झाडाखाली  पंढरपूरकडे जाणारी बस लागल्यानंतर आठवडी बाजारमुळे  खूप गर्दी  होती. या गर्दीमध्ये वडीलांना घेवून एस.टीत चढत असताना कोणीतरी पँटच्या मागील खिशाला हात लावल्याची फिर्यादीस जाणीव झाली. व फिर्यादीने खिसा तपासून पाहिले असता पँटच्या खिशात ठेवलेले 21 हजार रुपयेे नसल्याचे लक्षात आले. आजूबाजूला  व एस.टी.मध्ये पैसे पडलेत का याचा शोध घेतला असता पैशाचे पॉकेट मिळून आले नाही. अज्ञात चोरटयाने ते पॉकेट नेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत चोरीची फिर्याद दाखल केली.अधिक तपास पोलिस नाईक योगीराज खिलारे करीत आहेत.
                  दरम्यान,मागील सोमवारी आठवडी बाजार दिवशी गुंजेगांव येथील एक शेतकरी द्राक्ष बागेसाठी लोखंडी साहित्य खरेदी करण्यासाठी बँकेतून एक लाख रुपये काढून खरेदी करण्यासाठी महालक्ष्मी स्टील येथे आले होते. मोटर सायकल लावून लघूशंकेसाठी गेले असता गाडीच्या डिकीत ठेवलेले एक लाख रुपये चोरटयांनी हातोहात पळविले. हा सर्व प्रकार सी.सी.टि.व्ही.कॅमेरात कैद झाला होता. सी.सी.टि.व्ही. फुटेजही
  मंगळवेढा शहर बीट पोलिसांना दिले होते. ही चोरीची घटना पोलिस स्टेशनपासून केवळ दिडशे ते दोनशे फुटाच्या अंतरावर घडली होती. या घटनेपुर्वी सांगोला येथील एका महिला डॉक्टरच्या गळयातील बसस्थानकावर सांगोला बसमध्ये चढत असताना 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसुत्र चोरटयांनी पळविले होते. या दोन्हीही चोरीच्या घटनेचा तपास करण्यात शहर बीट पोलिसांना अपयश आले आहे.पुन्हा आज सोमवारी उपचारासाठी निघालेल्या शेतकर्‍याच्या पैशावर चोरटयांनी डल्ला मारल्यामुळे शहर बीट पोलिस नेमके करतात तरी काय असा संतापजनक सवाल विचारला जात आहे.डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांनी गांभिर्यपुर्वक याकामी लक्ष घालून शहर बीट पोलिसांची खांदेपालट करावी अशी मागणी जोर धरत आहे.
         प्रत्येक सोमवारी आठवडी बाजार दिवशी चोरीच्या  घटना घडत असताना बसस्थानकावर पोलिस का नेमले जात नाहीत,बाजारातून साध्या गणवेशात पोलिस फेरफटका का मारत नाहीत असा सवालही नागरिक करीत आहेत.पोलिस प्रशासन आणखी किती चोर्‍या होण्याची वाट बघणार आहे असा संतापजनक सवाल चोरीच्या वाढत्या घटनेवरून विचारला जातो आहे.शहर बीटला सक्षम व कर्तव्यदक्ष पोलिसांची गरज आहे.सक्षम पोलिस नेमल्याशिवाय वाढत्या चोरीला आळा बसू शकणार नसल्याच्या प्रतिक्रिया शहरवासियांतून व्यक्त होत आहेत.

Pages