कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या चित्रांचे शनिवारपासून प्रदर्शन.. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, August 22, 2019

कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या चित्रांचे शनिवारपासून प्रदर्शन..



सोलापूर/प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी स्वतःच्या कुंचल्यातून रेखाटलेल्या विविध चित्रांचे प्रदर्शन शनिवार, 24 ते सोमवार 26, ऑगस्ट 2019 या कालावधीत डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे भरवण्यात येणार असल्याची माहिती स्वतः कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी दिली.
        बुधवारी, सकाळी विद्यापीठात कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की,  लहानपणापासूनच चित्रे काढण्याची आवड होती. पुढे शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना चित्रकार डॉ. विष्णू पाठक यांच्याकडून पेंटिंगबाबत मूलभूत शिक्षण घेऊन चित्रे काढण्यास सुरुवात केली. अध्यापन आणि संशोधन करीत असताना मिळेल त्या वेळेत चित्रे काढण्याचा छंद जोपासत असल्याचे सांगून डॉ. फडणवीस यांनी कुलगुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापुरात कलाकारांच्या आग्रहाखातर चित्र प्रदर्शन भरवित असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये एकूण 45 चित्रे असणार आहेत. गेल्या 30 वर्षांपासून काढलेल्या चित्रांचा यात समावेश आहे.

शनिवार, 24 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11:30 वाजता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या चित्र प्रदर्शनास सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांच्यासह चित्र प्रेमी नागरिक भेट देणार आहेत.

कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी काढलेल्या ऑइल, वारली, ॲबस्ट्रॅक्ट, फिलामेंटरी या प्रकारच्या सुंदर चित्रे पाहण्यासाठी सोलापूरकरांनी भेट द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट
परदेशात विकली चित्रे
शिक्षणतज्ञ आणि संशोधक असलेल्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या उत्तम चित्रकार आहेत. त्यांनी नागपूर, मुंबई, अमरावती तसेच मध्य प्रदेशातील सागर येथे आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. त्यांनी काढलेली काही चित्रे चीन, अमेरिका तसेच परदेशात विकली आहेत. शिक्षण क्षेत्रात ठसा उमटविण्याऱ्या कुलगुरू डॉ. फडणवीस या सुंदर चित्रे काढतात.

Pages